

आश्रय ट्रस्टच्या पुढाकाराने ऍनिमिया जनजागृती व नशामुक्ती अभियान
सिन्नर : दिनांक ०७.१०.२०२६ रोजी आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्ट, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानांतर्गत पोषण आहार व ऍनिमिया जनजागृती तसेच नशामुक्त भारत अभियानाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक संस्थेचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिन्नर, राष्ट्रीय छात्र सेना (आर्मी विंग) आणि ७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान देशभर सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.या उपक्रमामध्ये ‘पोषण आहार व ऍनिमिया जागरूकता’ या विषयावर आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टचे आरोग्य विभाग सचिव प्रोफेसर प्रकाश पांगम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शरीराला आवश्यक असणारी प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह तसेच इतर पौष्टिक घटक दैनंदिन आहारातून मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पालक, पालेभाज्या, फळे, गूळ-शेंगदाणे, काळे मनुके, खजूर यांसारख्या लोहयुक्त व पौष्टिक पदार्थांचा आहारात नियमित समावेश करण्याचे आवाहन त्यांनी केले.रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे ऍनिमिया होतो. ऍनिमियाचे प्रकार, कारणे तसेच ऍनिमिया टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबतही विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पोटातील जंतांमुळे शरीराची शक्ती कमी होऊन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, याबाबतही जनजागृती करण्यात आली.आश्रय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक ट्रस्टच्या संस्थापिका प्रीती दीपक नाईक यांच्या अनमोल मार्गदर्शनामुळे, सचिव गुरुप्रसाद दीपक नाईक यांच्या सहकार्यामुळे तसेच आरोग्य विभाग सचिव प्रोफेसर प्रकाश पांगम यांच्या अथक परिश्रमामुळे अशा प्रकारचे आरोग्यविषयक व सामाजिक जनजागृतीचे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. समाजातील तरुण पिढी निरोगी, व्यसनमुक्त आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
